लक्ष दीप उजळीत, प्रकाशाचा उत्सव कराया, आली दिवाळी
सृष्टी सारी दीपवीत, अंधाराला हिणवाया जणु, आली दिवाळी
एक ज्योत पणतीची, सार्या पणत्यांना प्रकाश देई
डोळ्यांचं पारणं बघ, फिटविते ही रोषणाई
इवलीशी ज्योत जग, उजळायाचे सामर्थ्य देई
संगतीनं दीपमान व्हायाचा, बघ जणु संदेश देई
प्रकाशाचं सामर्थ्य सांगाया, बघ बघ आली दिवाळी
आनंदाचा उत्सव हा, दु:ख सारे विसरवी
भवताली आप्त सारे, ताटव्यासम मनं फुलवी
सृष्टीतला आनंद टिपाया, दृष्टीला जणु शिकवी
दु:खांच्या कोंदणामधे, आनंदाचं रत्न जडवी
याची जाणीव द्याया जणु बघ आली दिवाळी
सारे वर्ष तेववीत ठेव, स्व:तातील आनंदज्योत
अंधारा पोटात ठेवून, उजळवं तुझं इवलं जगत
तुझ्यातल्या प्रकाशाची जाण, ठेव तू रे नियमीत
नवं जीवन नवी उर्मी, टाकून दे रे जुनी कात
तुझं जीणं उजळाया, हरएकवेळा येई दिवाळी
–पल्लवी केळकर
सूचना: सदर कविता जालरंग प्रकाशनाच्या दीपज्योती या दिवाळी अंकात प्रकाशीत झाली आहे. येथे ती पुन:प्रकाशीत करण्यात आली आहे.
(वरील चित्र मायाजालावरून साभार.)



Posted by मराठी गिटींग्ज on नोव्हेंबर 3, 2010 at १०:४० pm
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Posted by bhagwanagapurkar on नोव्हेंबर 7, 2010 at १०:४० सकाळी
नमस्कार
(मनातले भाव ब्लॉग कार )
पल्लवी
तुमच्या दिवाळी विषयीच्या दोन्ही कविता आवडल्या .
बरे वाटले. दिवाळीचा एक फराळ होता.
दिवाळी येते प्रकाश आणते अंधाराला दूर सारुनी
आनंदाच्या लाटा निर्मित दैनंदिनीतील तणाव झाकुनी
भगवान नागापूरकर
(जीवनाच्या रगाड्यातून मराठी ब्लॉगकार )
Blog in Marathi.
http://bhagwanagapurkar.wordpress.com/
Posted by pallavikelkar on नोव्हेंबर 10, 2010 at १०:४० pm
धन्यवाद भगवानजी. ब्लॉगवर स्वागत!