घरातला पुरूष हा फार कमी व्यक्त होतो. सर्वसाधारणपणे त्याला काय वाटते, ते मोकळेपणाने बोलले जात नाही. सारी कर्तव्ये पार पाडल्यानंतर जेव्हा निवांतपणे आपल्या आयुष्याचा विचार करताना त्याला काय वाटत असेल ते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मी फक्त पुढे पहात, पुढे जात राहिलो
आहेत सारे संगती, या भ्रमात राहिलो
कसलीच जाणीव नव्हती, ना अंतर ना वेगाची
खचितच नव्हती जाण, आकांक्षांच्या यज्ञातील आहूत्यांची
माझ्या निवडीचा मार्ग मज अजून स्मरतो आज
मी जागत होतो नित्य, मिळाया इतरा सुखाची निज
मी करत राहिलो सदैव, समजून त्यांची गरज
त्यांना काय हवे पुसावे, कधी वाटलेच नाही मज
मी करतो.. मी करतो फक्त म्हणत राहिलो
या फसव्या अभिमानाने का जगत राहिलो?
आज इथवर आलो सर्व जिंकूनी, तेव्हा जाणीव झाली
मृगजळासम भासली ओंजळ, परी का रिती निघाली!
–पल्लवी


Posted by देवेंद्र चुरी on नोव्हेंबर 26, 2010 at १०:४० pm
त्याच्या अव्यक्त भावना सुंदर शब्दात व्यक्त केल्यात…मस्तच…!
Posted by Rohini mithe on फेब्रुवारी 3, 2011 at १०:४० pm
oanjal,khrech aapan khup karunhi kadhi kadhi ritech rahto…aawdali..