ही कविता अगदी सार्यांची आहे, प्रातिनिधिक आहे. आईची, आजीची, बायकोची, बहिणीची मने असेच काही सांगत असतील.थोडा विचार केला तर पटेल हे, आपले अखंद ऐकून घेणारी आई/ आजी/ बहीण/ बायको कधी त्यांचे काही म्हणणे असेल हे विसरले जाते ते कळतही नाही! त्यांचेच हे मनोगत..
चालले तुमच्यासवे परी एकटी मी, जाणून घ्या
सार्यांशी जरी नाते माझे, स्वतंत्र मी जाणून घ्या
मी सुखाची आदर्श प्रतिमा, दु:ख माझे मजसवे
मी घेतला वसा आनंदाचा, अदृश्य माझी आसवे
आधारस्तंभालाही कधी एकटेसे वाटत असेल
अव्यक्त सार्या भावनांचा कल्लोळही माजत असेल
आधार घेणे ठाऊक सर्वा, तयाचा कोणा विचार?
दोष कोणाचाच नाही, कर्तव्याचा हा अविष्कार
दात्यावे द्यावे सारे निमुटपणे, व्यक्त न व्हावे
अन घेणार्याचे सारे गार्हाणे शांतपणे ऐकून घ्यावे
मोठेपण काटेरी मुकुट, भारी अवघड भासे
पुढला दिसतो मार्ग, परतीचा रस्ता न दिसे
–पल्लवी


Posted by Rakesh on डिसेंबर 6, 2010 at १०:४० pm
स्त्रिची अबोल व्यथा छान मांडली आहे.
अभिनंदन………..!!!
Posted by pallavikelkar on डिसेंबर 7, 2010 at १०:४० सकाळी
धन्यवाद!
Posted by sachhin on डिसेंबर 7, 2010 at १०:४० pm
तुम्ही खरच धाडसी कवयीत्री वाटता. ही कविता प्रातिनिधीक कविता आहे जी मराठी साहित्याची सद्यस्थिती दर्शविते.
Posted by Anukshre on डिसेंबर 7, 2010 at १०:४० pm
मनाचे आक्रंदन छान पोहोचलय, प्रत्येक घरी थोड्या फार फरकाने हेच असते. सुरेख काव्य…