स्वतःपुरत

आजकाल आपण स्वत:मधे इतके गुरफटलेले असतो की, बाकी काही काही दिसत नाही. मुद्दामून नसेल कदाचित पण संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, असे कुठेतरी वाटते. आज त्याचबद्दल…

स्वतःपुरत आयुष्य फक्त स्वतःपुरत जगायचं
जगात आहोत म्हणत राहायचं बाकी काही नाही करायचं!

इतरांच्या झोपड्या जळाल्या, उघड्या डोळ्यानं पहायचं
चुकचुकून हळहळयुक्त भावना व्यक्त करीत रहायचं
सभेबिभेत श्रद्धांजली म्हणून मौन वगैरे बाळगायचं
मग मेलेल्या मनाची वळकटी शरीरात भरून कामाला लागायचं

थोऱ्यामोठ्यांबद्दल अगदी भरभरून बोलायचं
जयंत्या पुण्यातिथ्यांना स्मृतींना वंदन-बिंदन करायचं
व्यवहाराच्या गोष्टी या, विसरून नाही चालायचं
मग याच स्मृती पडद्याआड सारून आपल्या कामाला लागायचं

अजरामर इतिहासाबद्दल पुढच्या पिढीला सांगत रहायचं
वर्षानुवर्षाच्या परंपरा या, सारं तसंच पुढे चालू ठेवायचं
इतिहास घडविण्याच्या भानगडीत कशाला उगाच पडायचं?
शेजारच्या घरात शिवाजी जन्मेल तेह्वा जन्मेल आपल्याला काय करायचं

–पल्लवी

काटेरी मुकुट

ही कविता अगदी सार्‍यांची आहे, प्रातिनिधिक आहे. आईची, आजीची, बायकोची, बहिणीची मने असेच काही सांगत असतील.थोडा विचार केला तर पटेल हे, आपले अखंद ऐकून घेणारी आई/ आजी/ बहीण/ बायको कधी त्यांचे काही म्हणणे असेल हे विसरले जाते ते कळतही नाही! त्यांचेच हे मनोगत..

 • चालले तुमच्यासवे परी एकटी मी, जाणून घ्या

  सार्‍यांशी जरी नाते माझे, स्वतंत्र मी जाणून घ्या

 • मी सुखाची आदर्श प्रतिमा, दु:ख माझे मजसवे

  मी घेतला वसा आनंदाचा, अदृश्य माझी आसवे

 • आधारस्तंभालाही कधी एकटेसे वाटत असेल

  अव्यक्त सार्‍या भावनांचा कल्लोळही माजत असेल

 • आधार घेणे ठाऊक सर्वा, तयाचा कोणा विचार?

  दोष कोणाचाच नाही, कर्तव्याचा हा अविष्कार

 • दात्यावे द्यावे सारे निमुटपणे, व्यक्त न व्हावे

  अन घेणार्‍याचे सारे गार्‍हाणे शांतपणे ऐकून घ्यावे

 • मोठेपण काटेरी मुकुट, भारी अवघड भासे

  पुढला दिसतो मार्ग, परतीचा रस्ता न दिसे

  –पल्लवी

  ओंजळ

  घरातला पुरूष हा फार कमी व्यक्त होतो. सर्वसाधारणपणे त्याला काय वाटते, ते मोकळेपणाने बोलले जात नाही. सारी कर्तव्ये पार पाडल्यानंतर जेव्हा निवांतपणे आपल्या आयुष्याचा विचार करताना त्याला काय वाटत असेल ते  या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  मी फक्त पुढे पहात, पुढे जात राहिलो

  आहेत सारे संगती, या भ्रमात राहिलो

   

  कसलीच जाणीव नव्हती, ना अंतर ना वेगाची

  खचितच नव्हती जाण, आकांक्षांच्या यज्ञातील आहूत्यांची

   

  माझ्या निवडीचा मार्ग मज अजून स्मरतो आज

  मी जागत होतो नित्य, मिळाया इतरा सुखाची निज

   

  मी करत राहिलो सदैव, समजून त्यांची गरज

  त्यांना काय हवे पुसावे, कधी वाटलेच नाही मज

   

  मी करतो.. मी करतो फक्त म्हणत राहिलो

  या फसव्या अभिमानाने का जगत राहिलो?

   

  आज इथवर आलो सर्व जिंकूनी, तेव्हा जाणीव झाली

  मृगजळासम भासली ओंजळ, परी का रिती निघाली!

  –पल्लवी

  दिवाळी

   

  लक्ष दीप उजळीत, प्रकाशाचा उत्सव कराया, आली दिवाळी
  सृष्टी सारी दीपवीत, अंधाराला हिणवाया जणु, आली दिवाळी

  एक ज्योत पणतीची, सार्‍या पणत्यांना प्रकाश देई
  डोळ्यांचं पारणं बघ, फिटविते ही रोषणाई
  इवलीशी ज्योत जग, उजळायाचे सामर्थ्य देई
  संगतीनं दीपमान व्हायाचा, बघ जणु संदेश देई
  प्रकाशाचं सामर्थ्य सांगाया, बघ बघ आली दिवाळी

  आनंदाचा उत्सव हा, दु:ख सारे विसरवी
  भवताली आप्त सारे, ताटव्यासम मनं फुलवी
  सृष्टीतला आनंद टिपाया, दृष्टीला जणु शिकवी
  दु:खांच्या कोंदणामधे, आनंदाचं रत्न जडवी
  याची जाणीव द्याया जणु बघ आली दिवाळी

  सारे वर्ष तेववीत ठेव, स्व:तातील आनंदज्योत
  अंधारा पोटात ठेवून, उजळवं तुझं इवलं जगत
  तुझ्यातल्या प्रकाशाची जाण, ठेव तू रे नियमीत
  नवं जीवन नवी उर्मी, टाकून दे रे जुनी कात
  तुझं जीणं उजळाया, हरएकवेळा येई दिवाळी

  –पल्लवी केळकर

  सूचना: सदर कविता जालरंग प्रकाशनाच्या दीपज्योती या दिवाळी अंकात प्रकाशीत झाली आहे. येथे ती पुन:प्रकाशीत करण्यात आली आहे.

  (वरील चित्र मायाजालावरून साभार.)

  दिवाळी

  आजकाल एकत्र कुटंबपद्धती जशी कमी होत चालली आहे त्याचप्रमाणे, खेड्यात राहणारी लोकं फार मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी / शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्याने, घरं रीती होऊ लागली आहेत. अशावेळी दिवाळी कुटुंब एकत्र आणून कशी सुख आणते, अशा आशयाचं हे आईचं/ आजीचं मनोगत!

  येतील पाखरे घराच्या ओढीनं, दिवाळी साजरी कराया
  रितं माझं घर सारं, बघ येतील नंदनवन कराया

  पाखरांना भरवेन, मी घास गं मायेचा
  मिळेल ऊब, डोक्यावर हात गं मायेचा

  हसतील बागडतील, माझी लेकरं घरभर
  काय सांगू, कशी सांगू, किती आनंदेल माझं उरं

  भरलं गोकूळ हेच सुख, घेऊन येते गं दिवाळी
  लेकरांच सुख भरभरून, बघ देते ही दिवाळी

  रितेपणाचा अंधार, दूर करते ही दिवाळी
  खरं सांगू फक्त म्हणून, मज आवडते ही दिवाळी

  –पल्लवी

  कोण मी?

  रक्षकाच्या भक्षकाच्या हातातली बंदूक मी
  प्राण घ्यायाचेच ठाऊक मात्र लक्ष ठरविणारी न मी

  शस्त्र मी कापायचेच ठाऊक मजला
  सर्प मी डंखायचेच ठाऊक मजला

  मी कर्म.. ना कर्ता, सदगुण नी दुर्गुणही मी
  दृश्यातली प्रतिमाही मी नी अदृश्य ती प्रतीभाही मी

  ओळखावे आपापले, नियमांतली सक्ती न मी
  नियमांचे नियम ठरवीणारी, परी एक उक्ती न मी

  तुझ्यातली ठिणगी मी नी तुझ्यातील सूर्यही मी
  तुझ्यातले पूर्णत्व मी परी न जाणसी कोण मी?

  घड्याळ

  घड्याळाचे काटे कसे रोज धावतात
  धावतात ते नी संगे मला पळवतात
  टीक टीक त्यांची अन धड धड माझी
  नाळेसम घट्ट जणू नातं सांगतात

  त्यांच्यासाठी मी की माझ्यासाठी ते
  मोठाच संभ्रम आहे
  विचार करून असा हसत असेल ते
  मला पक्का संशय आहे

  कधी कधी फार याचा तिटकारा वाटतो
  कोंबड्यांच्या बांगेचं मग तोंड बंद करीतो
  मग त्यांच्याकडॆ पाहून आपण आरवितो
  उशीर झाला.. उशीर झाला म्हणून परत धावितो

  फक्त तीन काट्यामधे जग फिरवितो
  न बोलताच काही, सारे काही सांगितो
  किती सोपं काम आणि किती मोठा हुद्दा
  या घड्याळाचा मला तर हेवाच वाटतो!

  -पल्लवी केळकर

  नेमकं काय असतं?

  माझ्या प्रश्नाआधीच तुला,
  उत्तर त्याचं ठाऊक असतं
  माझं मन तुला कळतं
  की मला तुझं नाही
  नेमकं काय असतं?

  –पल्लवी केळकर

  आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

  एकानं दुसर्‍याला मारलं
  मारणं हे चूकच म्हणणार
  अरे पण, का मारलं ते मुळीच नाही विचारणार
  आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

  एखादा झोपडीत रहातो
  त्याला वाईटच म्हणणारं
  स्वत:च्या पोरांचे दिवे नाही बघणारं
  झोपडीवरनं माणूस ठरवणारं
  आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

  धर्माचे, संस्कारांचे दिंडोरे पिटणारं
  देवाला दहादा नमस्कार करणार
  बायका-पोरांवर हुकुमत गाजवणार
  तेव्हा अधात्म वगैरे सगळं गुंडाळून ठेवणारं
  आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

  आयुष्य स्वत:पुरतच जगणारं
  तरी समाजावर टीका करणार
  वर तत्वज्ञानाचे दाखले देणार
  आम्ही क्रियेविना वाचाळणार
  आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

  –पल्लवी

  चारोळी – माणसं

  जगात आपलं कोणीच नसणं
  खरचं किती भयंकर आहे
  जाणवतं..भोवताली माणसांचं असणं
  हे किती मोठं सुख आहे
  –पल्लवी