नेमकं काय असतं?

माझ्या प्रश्नाआधीच तुला,
उत्तर त्याचं ठाऊक असतं
माझं मन तुला कळतं
की मला तुझं नाही
नेमकं काय असतं?

–पल्लवी केळकर

Advertisements

आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

एकानं दुसर्‍याला मारलं
मारणं हे चूकच म्हणणार
अरे पण, का मारलं ते मुळीच नाही विचारणार
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

एखादा झोपडीत रहातो
त्याला वाईटच म्हणणारं
स्वत:च्या पोरांचे दिवे नाही बघणारं
झोपडीवरनं माणूस ठरवणारं
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

धर्माचे, संस्कारांचे दिंडोरे पिटणारं
देवाला दहादा नमस्कार करणार
बायका-पोरांवर हुकुमत गाजवणार
तेव्हा अधात्म वगैरे सगळं गुंडाळून ठेवणारं
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

आयुष्य स्वत:पुरतच जगणारं
तरी समाजावर टीका करणार
वर तत्वज्ञानाचे दाखले देणार
आम्ही क्रियेविना वाचाळणार
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

–पल्लवी

चारोळी – माणसं

जगात आपलं कोणीच नसणं
खरचं किती भयंकर आहे
जाणवतं..भोवताली माणसांचं असणं
हे किती मोठं सुख आहे
–पल्लवी

चारोळी-७

असून असून नक्की काय असतं जगणं
दुसर्‍याच्या दु:खात आपलं मन भिजणं
आपला आनंद सर्वांना भरभरून वाटणं
आपलं दु:ख पोटाशी घेऊन पणतीसम तेवणं
–पल्लवी

चारोळी – ६

तुझ्यातल्या तुला जरा
बघ करून बाजूला..
अर्थ तुझ्या जगण्यातील
उमगेल तुझा तुला

–पल्लवी

निरागस

कुठं चुकतं ते खरचं, कधी कधी कळतच नाही
आपली चूक शोधली तरीही मिळतच नाही

खूप सारे प्रश्न आणि उत्तर काहीच नाही
डोळे मिटले शांत तरी मनात खदखदत असते काही

जपून ठेवलेल्या आठवणीही डोके वर काढतात
पाणावल्या डोळ्यात विरघळून जाऊ पाहतात

असं आपलं रूप फक्त आपल्यालाच कळतं
आपल्यालाच कळतं कारण ते आपल्यापुरतं असतं

स्वत:लाच स्वत:शी भेट घालून देतं
आपलं प्रत्येकाचं एक निरागस रुप असतं

– पल्लवी केळकर

चारोळी-५

मरणापेक्षा  हे जगणं

फार अवघड होऊन बसलयं

अवघड गोष्टी का आवडतात मला

याचंच कोडं पडलयं

-पल्लवी