आजकाल आपण स्वत:मधे इतके गुरफटलेले असतो की, बाकी काही काही दिसत नाही. मुद्दामून नसेल कदाचित पण संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, असे कुठेतरी वाटते. आज त्याचबद्दल…
स्वतःपुरत आयुष्य फक्त स्वतःपुरत जगायचं
जगात आहोत म्हणत राहायचं बाकी काही नाही करायचं!
इतरांच्या झोपड्या जळाल्या, उघड्या डोळ्यानं पहायचं
चुकचुकून हळहळयुक्त भावना व्यक्त करीत रहायचं
सभेबिभेत श्रद्धांजली म्हणून मौन वगैरे बाळगायचं
मग मेलेल्या मनाची वळकटी शरीरात भरून कामाला लागायचं
थोऱ्यामोठ्यांबद्दल अगदी भरभरून बोलायचं
जयंत्या पुण्यातिथ्यांना स्मृतींना वंदन-बिंदन करायचं
व्यवहाराच्या गोष्टी या, विसरून नाही चालायचं
मग याच स्मृती पडद्याआड सारून आपल्या कामाला लागायचं
अजरामर इतिहासाबद्दल पुढच्या पिढीला सांगत रहायचं
वर्षानुवर्षाच्या परंपरा या, सारं तसंच पुढे चालू ठेवायचं
इतिहास घडविण्याच्या भानगडीत कशाला उगाच पडायचं?
शेजारच्या घरात शिवाजी जन्मेल तेह्वा जन्मेल आपल्याला काय करायचं
–पल्लवी
Posted by प्राची on एप्रिल 26, 2011 at १०:४० pm
खरंय… स्वत:पुरतंच जगत राहतो आपण….. छान कविता…
Posted by pallavikelkar on एप्रिल 26, 2011 at १०:४० pm
धन्यवाद.
Posted by Sayali on एप्रिल 26, 2011 at १०:४० pm
अगदी खर आहे पल्लवी..आपण खरच अगदी स्वतःपुरत आणि स्वतःच्याच विश्वात जगत असतो….आपल्या स्वतःच्याच आयुष्यात इतके मश्गुल असतो की इतरांच काही का होईना…
कविता एकदम मस्त झाली आहे…खूप छान……
Posted by Anil Paranjape on एप्रिल 26, 2011 at १०:४० pm
वा वा… जी गोष्ट आपल्याला खात असते पण कुणी त्याचा उल्लेख केलेला पण नको असतो ते तू बोललीस..
‘मग मेलेल्या मनाची वळकटी शरिरात भरून कामाला लागायचं’!!
आज काय केलं याचा रोज रात्री झोपताना आढावा घेताना जे विषण्ण वाटतं ते का वाटतं ते या वाक्यातून कळलं. अशावेळी खरंच तीच वळकटी लाथ मारून उलगडून त्यावर पडायला होतं!
अनिल
Posted by pallavikelkar on एप्रिल 26, 2011 at १०:४० pm
धन्यवाद सायली आणि अनिल.
खरचं प्रातिनिधिक भावना आहे ही, निवांत असताना त्रास देणारी.